तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके यांच्या खूनप्रकरणी आणखी तिघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एक अल्पवयीन आहे. तासगाव पोलिस व सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे परिसरात ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात नऊ संशयितांचा सहभाग समोर आला असून आणखी पाच जणांचा शोध पोलिस घेत आहेत.
अनिकेत संतोष खुळे (१९, रा. कात्रज, पुणे) व आकाश महिपत मळेकर (२०, रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यालयाने त्यांना १९ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल सज्जन फाळके याला यापूर्वी- अटक करण्यात आली आहे.
तासगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निलंबित
वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित विशाल सज्जन फाळके याला पूर्वीच्या गुन्ह्यात वेळेवर वॉरन्ट न बजावल्याने, कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत तासगाव पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी निलंबनाचा बडगा उगारला. पोलिस हवालदार वेदकुमार धोंड व पोलिस कॉन्स्टेबल पवन जाधव अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.