पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे विभागाला तब्बल १३४ ई-बस मिळणार आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत या बस पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. पुणे विभागात सध्या २७ शिवाई बस आणि ४३ शिवनेरी बस धावतात. मात्र, बसची संख्या कमी असल्याने वेगवेगळ्या मार्गावरील फेऱ्या कमी झाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना ताटकळतं बसची वाट पाहावी लागत आहे. पुणे विभागातून सध्या कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या मार्गांवर ई-बस धावत आहेत. येणाऱ्या काळात या सर्वच मार्गांवर ई-बसची संख्या वाढविण्यात येत आहे.
पुणे विभागात लालपरी बसची संख्या कमी झाल्याने प्रशासनाकडून नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी केली होती. येत्या दोन ते तीन महिन्यांत १३४ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. पुण्याचे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल म्हणाले की, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि कोल्हापूर या मार्गावर ई-बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, बसची संख्या कमी असल्याने बऱ्याच वेळा प्रवाशांना बसची ताटकळत वाट पाहावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने राज्य महामंडळाकडे ई-बसच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत १३४ ई-बस पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल होतील, असे त्यांनी सांगितले.