चाकण (पुणे) : भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्यास चौघांनी संगनमताने शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच भाडेकरू पती- पत्नीनेही त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. चाकण-आंबेठाण रस्त्यावरील कोरेगाव फाटा येथील हेरिजन कंपनी शेजारी आंबेठाण गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी दोन भावांसह त्यांचे भाडेकरू असलेले पती-पत्नी व अन्य दोघे अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गणेश बबन पडवळ (वय ३० रा. घाटेवस्ती, आंबेठाण) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सचिन तानाजी पडवळ (वय ३३), सुरेश तानाजी पडवळ (वय ४२ दोघे रा. घाटे वस्ती, आंबेठाण, ता. खेड) यी दोन भावांसह सचिन पडवळ यांचे भाडेकरू माधव सुदाम डावरे (वय ४०), त्यांची पत्नी किरण माधव डावरे (वय ३५, दोघे रा. कोरेगाव बुद्रुक), अनिल राजपूत (वय ३५) व अर्जुन (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश पडवळ हे शनिवारी (दि.१४) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान आंबेठाण येथील जमीन गट नंबर ४१२ मधून जात होते. यावेळी सचिन पडवळ व सुरेश पडवळ हे दोघे भाऊ बाबाजी पडवळ यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करत होते. यावेळी गणेश पडवळ हे भांडण सोडवण्यासाठी गेले. यावेळी त्या दोघांनी गणेश पडवळ यांना मारहाण केली. माधव सुदाम डावरे व त्यांची पत्नी किरण महादेव डावरे यांनीही गणेश पडवळ यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष पानसरे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.