पुणे : पुण्यातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. लिफ्टसाठी वाट पहात थांबलेल्या सोसासटीतील एका सदस्यावर कुत्री गुरगुरली. याचा राग मनात धरून चौघांनी कुत्रीच्या मालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून, तसेच लहान मुलांच्या सायकलने मारुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना पिसोळी येथील सार्थक बेलवा सोसायटीत १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी कृणाल विठ्ठल वासम (वय-३४, रा. सार्थक बेलवा सोसायटी, वाघवस्ती, पिसोळी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आशपाक तांबोळी, त्यांचे नातेवाईक वलीन खान व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वासम हे त्यांची कुत्री सिया हिला खाली फिरायाला घेऊन आले होते. तिला परत घरी घेऊन जाण्यासाठी लिफ्टच्या लॉबीमध्ये थांबले होते. त्यावेळी सोसायटीत राहणारे आशपाक तांबोळी त्याठिकाणी आले. ते लिफ़्टची वाट पाहत थांबले होते. त्यांच्याकडे पाहून ती कुत्री गुरगुरली. त्याचाच राग मनात धरुन तांबोळी यांनी कृणालला अर्वाचं भाषेत शिवीगाळ केली. फिर्यादी तांबोळी यांना समजावत असताना त्यांनी फिर्यादीच्या कानाखाली मारली.
दरम्यान, पार्किंगमध्ये असणारी लहान मुलांची सायकल घेऊन फिर्यादी यांना जोरात मारली. मात्र, फिर्यादी यांनी उजवा हात पुढे केल्याने हाताला गंभीर जखम झाली. त्यानंतर फिर्यादी हे लिफ्टच्या लॉबीमधील कट्ट्यावर बसले होते. तेव्हा तांबोळी यांच्या कुटुंबातील दोघांनी शिवीगाळ करुन त्यांना खाली पाडले. तसेच लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. आरोपीचा नातेवाईक वलीन खान हा तेथे आला. तो म्हणाला की, आण रे रॉड याला आता मारुन टाकू, असे म्हणून धमकी दिली. पुढील तपास पोलिस हवालदार लोणकर करीत आहेत.