पुणे : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सुरु केली होती. या योजनेसाठी एकूण 46 हजार कोटी वर्षाला लागणार होते. मात्र, योजना जुलै 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36 हजार कोटी लागणार होते. तशी तरतुद राज्य सरकारने केली आहे. यापैकी 17 हजार कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 19 हजार कोटी शिल्लक आहेत.
आताच्या पुरवणी मागणीत 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पुर्ततेसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत 14 हजार कोटी रुपये लागणार आहेत. आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20 हजार 400 कोटी शिल्लक आहेत.
जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतुद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यात आहे.