मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे. तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहात. बाहेरचं वातावरण तुम्हाला सूट होत नाही, असे तुमच्या बडबडण्यावरून वाटत आहे. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी अशी वक्तव्ये करणे टाळा, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्र कर्नाटक वाद चांगलाच तापला असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. यामुळे शिंदे गटातील आमदार व मंत्री शंभूराज देसाई हे चांगलेच संतापले असून त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल असा थेट इशाराच दिला.
शंभूराज देसाई यांनी अत्यंत तिखट शब्दात राऊत यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्राची बाजू भक्कम कशी आहे, हे पटवून देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळोवेळी दिल्लीत जाऊन प्रयत्न करत आहेत. यावर संजय राऊत हे सरकार षंढ असल्याचे विधान केले होते.
संजय राऊत स्वत: कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. ते पूर्ण करण्याचं धाडसही संजय राऊत यांच्यात नाही. आम्ही शेपूट घातलं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना न्यायालयीन कवच असतानाही कर्नाटकमध्ये जायची हिंमत करता आली नाही. यावरून ते किती घाबरले होते, हे कळते. मग ते किती मोठे षंढ आहेत, असे आम्ही म्हटले तर चालेल का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी म्हटले.
तसेच संजय राऊत आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली बेळगावमध्ये जाऊ, असे म्हटले. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व सोडले आहे का? असा सवाल शंभूराज देसाई यांनी विचाराला. राऊतांना शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी विचारला. हीच गोष्ट आम्ही शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. संजय राऊत यांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधायचा होता, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.