पुणे : पुणे नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात डंपरची धडक बसून पादचारी मृत्युमुखी पडला. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय ५८, रा. उबाळेनगर, वाघोली) हे मृताचे नाव आहे. यासंदर्भात सरडे त्यांचा मुलगा समाधान (वय २०) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इंद्रजीत सरडे यांचा दुध विक्रीचा व्यवसाय आहे. ते गुरुवारी सायंकाळी सोसायटीत दूध विक्री करुन घरी चालले होते. वाघोलीतील उबाळेनगर परिसरात भरधाव डंपरची त्यांना धडक बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरडे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालक राजू पांडू चव्हाण (वय २४, रा. सुयोगनगर, भावडी रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.