सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये २.५७ कोटी रुपये मूल्याच्या बनावट नोटांसह चौघांना अटक करण्यात आली. या चारपैकी तीन आरोपी महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दत्तात्रय रोकडे, राहुल विश्वकर्मा व राहुल काळे अशी त्यांची नावे आहेत. तर गुलशन गुगाले हा चौथा आरोपी सुरतचा रहिवासी आहे.
सुरतच्या सरोली भागात शनिवारी सायंकाळी तीन पिशव्यांसह तिघे पायी जात होते. पोलिसांना संशय आल्यानंतर तपास नाक्यावर अडवून त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याजवळील पिशव्यांमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांच्या ४३ गड्या लपवलेल्या आढळून आल्या. प्रत्येक गडीत १ हजार नकली नोटा होत्या. कुणाला शंका येऊ नये म्हणून प्रत्येक गड्डीत पहिली व शेवटची नोट खरी ठेवण्यात आली होती.
यासोबतच २०० रुपयांच्या बनावट प्रत्येकी १ हजार नोटा असलेल्या २१ गड्याही त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बँका, बाजारपेठांद्वारे या बनावट नोटा सामान्य लोकांना फसवून व्यवहारात आणण्याचा या चौघांचा कट होता. या सर्व नोटांवर क्रमांक नव्हते, तसेच त्यांच्यावर ‘भारतीय बच्चों का खाता’ असे लिहिलेले होते. आरोपींविरोधात फसवणूक, गुन्हेगारी कट व गंभीर गुन्ह्यांचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.