-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा, शिरूर तालुका व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व तहसिल कार्यालय, शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय ग्राहक दिना’ निमित्त ग्राहक प्रबोधन जागरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिरुर तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे यांनी दिली आहे.
देशभरात 24 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे (दि. 17 डिसेंबर) रोजी साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालय, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सकाळी 11 ते 12.30 पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच (दि. 23 डिसेंबर) रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय आवार, शिरूर येथे तहसीलदार कार्यालय, पुरवठा विभाग, पंचायत समिती, शिक्षण. आरोग्य, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, दुय्यम निबंधक, सहाय्यक निंबधक, वन विभाग, सामाजिक वनीकरण , वजन मापे (वैधमापन), अन्न व औषध (भेसळ प्रतिबंधक कार्यालय ), बस स्थानक, पोलीस ठाणे, कोषागार कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती असे विविध शासकीय कार्यालय एकाच छताखाली येणार असून नागरीकांना आपल्या योजना समजावून सांगून पत्रके छापून प्रबोधन करणार आहे.
पुणे जिल्हयातील हा एकमेव सर्वात मोठा प्रबोधनाचा कार्यक्रम शिरूर येथे होत आहे, असे राज्याध्यक्ष ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा अशोक भोरडे यांनी सांगितले आहे.