पुणे : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे. त्यामुळे अनेकजण उघड नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
विजय शिवतारे म्हणाले माझ्यासाठी मंत्रिपद महत्वाचं नाही. माझ्यासाठी काम करणं महत्वाचं आहे, कारण मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. मला दु:ख एवढं आहे की महाराष्ट्र कुठे चालला आहे? तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि तेथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशा माणसांच्या हातात सत्ता देत आम्ही महाराष्ट्र पुढे नेला आहे. पण आता आपण मागे चाललो आहे का? आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय का?, असे अनेक सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केले आहेत.
पुढे बोलताना म्हणाले, मला माझं नाव मंत्रिमंडळातून कट झाल्याचं दु:ख नाही. पण लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. तसं न झाल्यामुळे शंभर टक्के नाराजी आहे, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसेच आता पुढची भूमिका काय? असा प्रश्न विचारलं असता शिवतारे म्हणाले की, आता अडीच वर्षांनंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला त्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं करून घेणं महत्वाचं आहे. मला मंत्रिपदाबाबत राग नाही. पण वागणुकीबाबत जास्त राग आहे, असं म्हणत विजय शिवतारे यांनी खदखद व्यक्त केली.