धुळे : राज्यात परभणीतील घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच आता धुळ्यात एसटी बसवर दहा ते बारा जणांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नाशिक-शहादा बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दगडफेक का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परभणीतील आंदोलकांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. अशातच धुळे शहरातील दसरा मैदानात एसटी बसवर दहा ते बारा अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
या घटनेत बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या दगफेकीनंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.