मंचर (पुणे): पारगाव गावच्या हद्दीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अंदाजे तीन ते चार महिन्याचा बिबट्याचा बछडा ठार झाल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली. वैदवाडी परिसरातील श्रीहरी भिका बोऱ्हाडे हे सकाळी साडेआठच्या सुमारास आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांना शेतामध्ये बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती वनरक्षक साईमाला गित्ते यांना दिली.
ही माहिती समजताच मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक साईमाला गित्ते यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली असता सदर बिबट्याचा बछडा हा तीन ते चार महिन्याचा असून नर जातीचा असल्याचे आढळून आले. या बछड्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ पुरी यांनी केले असून बछडा हा सुदृढ होता. अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पोंदेवाडी येथील रोपवाटिकेत सदर बछड्यावर अग्निसंस्कार केल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी भोसले यांनी दिली.