पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात गुन्हेगारीमधे वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता धक्का का मारला, असा जाब विचारल्याने टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना अशोकनगर येथील मातोश्री चौकातील परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या टोळक्याकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी चंद्रकांत बबन तोडकर (वय-४९, रा. अशोकनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपी आशिष नवघरे, अमोल व त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत तोडकर हे इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी चालले होते. त्यावेळी त्यांच्या परिसरातील गुंड आशिष नवघरे व अमोल यांनी त्यांना जाणीवपूर्वक धक्का मारला. तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीला मला का धक्का मारला असे विचारले. त्यावर रोपींनी फिर्यादी यांच्या तोंडावर, डोळ्यावर, पाठीवर हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच आशिष नवघरे याने त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढून कोयत्याची मागील मुठ फिर्यादीच्या तोंडावर मारुन जखमी केले.
दरम्यान, आशिष याने परिसरातील इतर लोकांसमोर हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तसेच मी इथला दादा आहे, माझ्या नादी कोणी लागले तर मी कोणालाही सोडणार नाही,असे म्हणून परिसरात दहशत पसरविली. त्यामुळे तेथील लोकांनी त्यांची घरे व दुकाने भीतीने बंद केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील करीत आहेत.