ठाणे : संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू प्रसिद्ध हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय मराठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पुत्र गायक भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. संगीतसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
पंडित संजय मराठे यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पंडित राम मराठे यांचा वारसा संजय मराठे यांनी सुरु ठेवला. त्यांचे वडील हेच त्यांचे शिष्य होते. लहानपणापासून गोविंद पटवर्धन यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेतले. राम मराठे यांना त्यांनी अनेक वेळा साथ सांगत केली होती. त्यांची दोन्ही मुले प्राजक्ता आणि भाग्येश त्यांची परंपरा चालवत आहे. त्यांचे छोटे बंधू मुकुंद मराठे हे देखील त्यांच्याकडे गाणे शिकले होते. संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता.