-संतोष पवार
पळसदेव : उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय बारामती यांचेद्वारा पळसदेव (ता. इंदापूर) येथील श्री पळसनाथ विद्यालयात शक्ती अभियान पथकाच्या वतीने विद्यार्थी सुरक्षितता व खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी, नोकरवर्ग महिला, मुलीं यांच्याबाबत विविध गैरकृत्य अत्याचाराच्या विविध घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने सुरक्षितता व सुमपदेशन करण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यालयाच्या वतीने शक्तिकक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाच्या मार्फत महिला पोलिस पथकाची नेमणूक करण्यात आली असून विविध कॉलेज, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या येथील महिला नोकरवर्ग मुलींना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पळसदेव येथे शक्ती अभियान पथकाच्या प्रमुख मार्गदर्शिका वनिता कदम यांनी शालेय विद्यार्थीनींशी संवाद साधला. त्यावेळी मुलींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, शक्ती अभियान पथकाचा मुख्य हेतु महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन असा असून त्याअंतर्गत मुली, महिला, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे व कायदेविषयक मार्गदर्शन करणे असा आहे. त्याकरिता विद्यालये, कॉलेज, सरकारी कार्यालये विविध खाजगी कंपन्या येथे शक्तीबॉक्स (तक्रारपेटी ) बसवण्यात आली. त्यात मुली महिला यांनी आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्ती मुलांची तक्रार सदरच्या बॉक्समध्ये टाकावी.
पोलिसांमार्फत दर दोन ते तीन दिवसांनी सदर तक्रारपेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणा-या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल. 9209394917 या क्रमांकाची सेवा 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावर फोन किंवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचे त्वरित निराकरण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे बाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
विद्यार्थिनींनी शाळेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. गुड टच बॅड टच याबाबत दक्ष रहावे . याशिवाय शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस शालेय परिसरात टवाळखोर मुलांचा वावर आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी. सदर परिसरातील मुलांकडून विद्यार्थ्यांनींना विनाकारण त्रास होणार नाही याबाबतही सदरच्या शक्ती अभियान पथकाकडून पाहणी केली जाणार आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, सिकंदर देशमुख, अशोक जाधव, नितीन जगदाळे, उज्ज्वला वाघमारे, शक्ती अभियान पथकाच्या पोलिस हवालदार शुभांगी दणाणे, वनिता कदम, प्रणाली भोसले आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते ..