-गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील पुणे वाघोली ते सिद्दीटेक या राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या साईट पट्टीवर काही कंत्राटी कंपन्यांकडून केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. या कामांसाठी ठिकठिकाणी खोदाई करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, विविध भागात होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. विकासकामे तर होणे गरजेचे असून, ही कामे वेळेत पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती तातडीने केली जाण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
राहु, पिंपळगाव, देलवडी, पारगाव अशा विविध गावामध्ये अनेक दिवसापासून या केबल लाईन साठी रस्त्यांची खोदाई सुरू केली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी शेतीसाठी असलेल्या पाईप लाईन फुटत आहे. तसेच या खड्ड्यामध्ये शेतीमाल बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होतात, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या केबल वाहिन्यांचे काम बरेच महिन्यापासून सुरू आहे. ते संथगतीने होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, वाहनचालक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील स्थानिक व प्रवासी रस्त्याच्या खोदाईमुळे त्रस्त झाले आहेत. जवळपास 200 फूट अंतरावर खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहने घसरून अपघात वाढले आहेत. रात्रीच्यावेळी खड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात देखील झाले आहेत.
तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने समोरून आल्याने वाहनचालकांना साईट पट्टीवर वाहन घ्यावे लागल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकाच्या विकासासाठी जरी या सुविधा असल्या तरी हे काम तातडीने पूर्ण व्हावे प्रवाशाची यातून सुटका व्हावी, असे मत व्यक्त केले जात आहे.