नागपूर : विधानसभेचा शनिवार २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल १३ दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज रविवारी (15 डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूरमध्ये पार पडला आहे.
1991 नंतर प्रथमच नागपूर येथील राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पहिली शपथ चंद्रशेखर बावनकुळे, तर दुसरी शपथ राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर तिसरी शपथ पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली. दरम्यान, महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह १९, शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्यांसह 11 आणि राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांसह ०९ मंत्रिपदांसह ३९ मंत्र्यांनी विधानसभा सभागृहात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
या मंत्र्यांनी घेतली शपथ
भाजप : चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, प्रकाश आबिटकर या आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर पुण्यातील पर्वती मतदार संघाचे आमदार माधुरी मिसाळ तसेच पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सुधीर मुनगंटीवार, डॉ. संजय कुटे, यांच्याबरोबरच योगेश सागर, , राणा जगजित सिंह, समीर कुणावार, आदींना संधी मिळण्याचीही शक्यता आहे.
शिवसेना : गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले या आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच आशिष जयस्वाल, योगेश कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादी : हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद जाधव-पाटील, बाबासाहेब पाटील या आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नागपुरात दुसऱ्यांदा शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा नागपुरात हा दुसरा शपथविधी पार पडला आहे. यापूर्वी १९९१ मध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसचा हात धरल्याने त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला आहे.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?
राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या जागी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच जिल्ह्यातील दुसरे आमदार नरहरी झिरवळ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही, याची कल्पना आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्कार समारंभाला अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा विविध पदांचा राजीनामा
मंत्रिपद नं मिळाल्यानं नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.