उरुळी कांचन (पुणे) : मास्टर्स गेम्स मैदानी स्पर्धेत उरुळी कांचन येथील धनंजय मदने यांनी ३ पदकांना गवसणी घातली. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो. आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी हेच आपल्या खेळातून सिद्ध करून दाखवले आहे. नाशिक येथे ५ वी महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स क्रीडा स्पर्धा २०२४ मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल मैदानावर जोशपूर्ण वातावरणात पार पडल्या.यामध्ये धनंजय मदने यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनने मैदानी स्पर्धांचे दि.१४ ते १५ डिसेंबर या दरम्यान आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पुणे येथील इनोसन्ट टाईम्स स्कूलचे क्रीडा शिक्षक धनंजय लक्ष्मण मदने यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी ११० मीटर हाईल्स स्पर्धा-सुवर्णपदक, ३००० मीटर स्टीफलचेस स्पर्धा – ब्रांचपदक व उंच उडी- सुवर्णपदक अशी एकूण तीन पदके पटकावली आहेत.
पुणे जिल्हा संघाचे कर्णधार धनंजय मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संघास अजिंक्यपद प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव बाळू चव्हाण आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू महेंद्र बाजारे यांच्या हस्ते सुवर्ण पदक विजेते धनंजय मदने यांना सन्मानित करण्यात आले. सदर यशानंतर भुवनेश्वर येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये त्यांची निवड झाली आहे. यावेळी सुवर्ण पदक विजेते धनंजय मदने यांचे खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि इनोसन्ट टाईम्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. अंकिता संघवी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.