हिंगोली : शेतजमिनीमध्ये हिस्सेदार नको म्हणून स्वतःच्या भावाची हत्या करत त्याला जमिनीत बुजून टाकल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील शेगाव खोडके या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजी किसान खोडके (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके शेत शिवारात वडिलोपार्जित खोडके परिवाराची जमीन आहे. दोन भाऊ असल्याने दोघांना सामान वाटणी व्हावी, यासाठी लहान भाऊ शिवाजी याचा जमिनीत हिस्सा जावू नये. यासाठी मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे.
हरविल्याची दिली तक्रार
हरिभाऊ किसन खोडके या मोठ्या भावाने धक्कादायक कृत्य केले आहे. धक्कादायक म्हणजे मोठ्या भावाने शिवाजी याचा खून केल्यानंतर शेतातचा खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्यासाठी भावावर अंत्यसंस्कारही उरकून टाकले. त्या नंतर पोलीस ठाण्यात दाखल होत आपला लहान भाऊ हरवला असल्याची तक्रार देखील दाखल केली. यामुळे पोलिसांनी शिवाजी याचा शोध घेण्यास सुरवात केली होती.
खनाची दिली कबुली
तपास करत असताना पोलिसांना हरिभाऊ याच्यावर संशय बळावला. यामुळे पोलिसांनी भाऊ हरविल्याची तक्रार दाखल करणाऱ्या भावाला पोलीस खाक्या दाखवताच त्याने खुन केल्याची कबुली दिली. तसेच शिवाजी याला जमिनीत पुरल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी हरिभाऊ याला ताब्यात घेतले आहे.