पुणे : पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यातच आता पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ शंभर रुपयांसाठी मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे.
बाळू महादेव पोखरकर (वय 40, रा. खोडद, माळी मळा, ता. जुन्नर) याचा खून केल्याप्रकरणी राहुल भाऊसाहेब गुळवे (वय-32, मूळ रा. शिपलापूर पानोडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, सध्या रा. बाजारतळ, नारायणगाव, ता. जुन्नर) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शंकर पोखरकर यांनी फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती बाळू पोखरकर यांना दारुचे व्यसन होते. बाळू याने मित्र राहुल गुळवे याला मागील आठवड्यात दारु पिण्यासाठी शंभर रुपये उसने दिले होते. याकारणामुळे पोखरकर हे गुळवे यांच्याकडे पैशाची मागणी वारंवार करत होते. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे शुक्रवारी (ता.13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोखरकर यांनी गुळवे याला बस स्थानकाजवळ शिवीगाळ केली. या कारणावरुन गुळवे याने पोखरकर याला मैदानावर नेऊन त्याच्या डोक्यात दगडाने जोरात मारहाण करुन त्याला ठार मारले. त्यानंतर घटनास्थळावरुन गुळवे पसार झाला.
याप्रकरणी पोलीसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याआधारे पोलीसांनी आरोपी गुळवे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील चौकशी पोलीस करत आहे.