दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण चांगलेच तापले आहे. आज राहुल गांधी यांच्या वक्तव्यांनी सभागृहात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला आहे. मी एकदा माझी आजी इंदिरा गांधी यांना सावरकर यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी सावरकर हे इंग्रजांना मिळाले होते, अशी माहिती दिल्याचे राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितले. विरोधी पक्ष नेते आणि इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल यांच्या या नवीन वक्तव्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी यांच्या विधानाने महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली असल्याचे बोलले जात आहे.
सावरकरांविषयी राहुल गांधी काय म्हणाले?
सावरकर हे मनुस्मृतीला मानत होते. ही भूमिका घटनेच्या एकदम विरोधात आहे. सावरकर यांना संविधानामध्ये कधीच भारतीयत्व दिसले नाही. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंदिरा गांधी यांच्या एका पत्राचा उल्लेख केला आणि त्यांनी स्वांतत्र्यवीर सावरकरांना देशभक्त म्हटल्याचे सांगीतले. मग तुम्ही तुमच्या आजीला घटनाविरोधी म्हणणार का? असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला.
श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी उत्तर दिले. आंदोलन काळात सर्वच लोक तुरूंगात गेले होते. पण सावरकर हे तडजोड करणारे निघाले. त्यांनी घाबरून इंग्रजांची माफी मागीतली. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हंगामा सुरू झाला. काँग्रेस आणि भाजपाच्या सदस्यांनी एकच गोंधळ सुरू केल्याचे दिसुन आले.
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा पुढे..
राहुल गांधी यांनी 2022 मध्ये भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यांना माफीवीर म्हटले होते. त्यांनी त्याविषयीचे कागदपत्रं सुद्धा दाखवत दावे केले होते. पण त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. . संजय राऊत यांनी या मुद्दावर न बोलण्याचा सल्ला दिला. त्यांना सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी असल्याची आठवण करून दिली होती.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा आघाडीतून बाहेर पडण्याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण अखेरच्या टप्प्यात राहुल गांधी सावरकरांचा मुद्दा पुन्हा सभांमधून उगाळणार नाहीत, त्याची चर्चा करणार नाहीत, असा आग्रह ठाकरे गटाने घेतला. त्याला एकप्रकारे मूक संमती मिळाल्याचे दिसले होते. मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी हा मुद्दा समोर आला नाही. पण आता या निवडणुका झाल्यानंतर अचानक राहुल गांधी यांनी दोन वर्षानंतर सावरकरांबाबत वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे.
उद्धव ठाकरे गटाची झाली कोंडी?
राहुल गांधी यांच्या या नवीन वक्तव्याने महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. भाजपासह महायुतीमधील घटक पक्षांना टीकेचे आयते कोलीत मिळाले आहे. एकीकडे विधानसभेतील मोठ्या पराभवाने महाविकास आघाडीला झटका बसला आहे. आता पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि उद्धव सेना यांच्यामध्ये सुरु असताना राहुल गांधी ताज्या वादामुळे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.