पिंपळवंडी (पुणे) : पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावरून जात असताना एका तरूणाच्या मोटारसायकलवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण जखमी झाला आहे. अनिकेत रंगनाथ वामन असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून ही घटना गुरूवारी (दि.१२) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
अनिकेत वामन हा पिंपळवंडी-उंब्रज रस्त्याने त्याच्या मोटारसायकलवरुन नारायणगाव या ठिकाणाहून त्याच्या घरी काळवाडी या ठिकाणी जात असताना तोतरबेट या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर झेप घेतली व बिबट्याची दुचाकीला धडक बसल्यामुळे अनिकेत खाली पडला आणि बिबट्या तेथून पळ काढला. अनिकेत खाली पडल्यामुळे त्याच्या पायाला मार लागला. त्यानंतर काही नागरिकांनी जखमी झालेल्या अनिकेतला आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.