पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन रेस्क्युअर (अग्निशमन विमोचक) पदाच्या १५० जागा भरण्यात येणार आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा झाली असून शारीरिक चाचणी रखडली आहे. ती जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. अग्निशमन विभागाच्या फायरमन रेस्क्युअरच्या १५० पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १ हजार ५०० अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाले होते.
त्यासाठी ऑनलाईन परीक्षा २९ ऑगस्टला पुणे शहरातील ९ केंद्रांवर घेण्यात आली. त्यात ९०० उमेदवार उत्तीर्ण झाली आहेत. त्या उमेदवारांची शारीरिक चाचणी भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर सिंथेटिक ट्रॅक येथे घेण्यात येणार होती. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने शारीरिक चाचणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे शारीरिक चाचणी लांबणीवर पडली आहे.
शारीरिक चाचणी कोण घेणार आणि ती कशी घ्यायची याची तपासणी महापालिका प्रशासनाकडून केली जात आहे. परिणामी, उमेदवारांना चाचणी कधी होणार आणि भरतीचा निकाल कधी लागणार यांची उत्सुकता लागली आहे. त्याबाबत प्रशासन विभागाकडे चौकशी केली जात आहे.
नोकर भरतीसाठी पोलिस प्रशासनाने शारीरिक चाचणी घेण्यास नकार दिला आहे. परंतु, ते पालिकेला सहकार्य करणार आहेत. पुणे महापालिकेने घेतलेल्या शारीरिक चाचणीचे नियम तपासण्यात येत आहे. त्यानुसार महापालिका स्वतः शारीरिक चाचणी घेणार आहे. जानेवारी चाचणी घेण्याचे नियोजन आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका