पुणे : पुणे स्टेशन रेल्वे स्थानक परिसरातील टपऱ्यामुळे होणारी घाण या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून पुणे महानगरपालिका आयुक्तांना तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर बुधवार (दि.११) पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून परिसराची पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर पुणे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून रेल्व प्रशासनाला नोटीस देण्यात आली असून दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम यांनी दिले आहेत.
साठलेला केरकचरा, राडारोडा, पालापाचोळा व शौचालयाची स्वच्छता करून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या नोटीसीत म्हटले आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील घाण आणि अस्वच्छतेमुळे पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे या चांगल्याच वैतागल्या होत्या. शहर आणि पुणे रेल्वे स्थानकाचे नाव खराब होत असल्याने याबाबतची तक्रार पालिकेकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर लघुशंका करण्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही रेल्वेची असताना त्यांनी ही जबाबदारी पालिकेवर टाकू नये, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.