पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त आता रविवारवर गेला असून, उपराजधानी नागपुरात दुपारी ४ वाजता ३५ ते ४० मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सरकारमध्ये मंत्री होणार असल्याने भाजपमधून नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे.
त्यासाठी अनेक मोठ्या नावांची चाचपणी करण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच प्रदेशाध्यक्षा निवडला जाणार आहे. जर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात सामील न करण्याचा निर्णय घेतला तर सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडू शकते.
अर्थात हे तिघेही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याने आणि त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्यास ऐनवेळी नवे नाव समोर येण्याची शक्यता आहे. यात विधान परिषदेतील आमदार राम शिंदे, संजय कुटे, आशिष शेलार यांची नावे चर्चेत आहेत. परिषदेत असणाऱ्या आमदारांना मंत्रीपद न देण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्यास पंकजा मुंडे, राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.