जंक्शन : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून दोघांची ७ लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. इंदापूर न्यायालयाने त्याला १७ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा प्रकार १५ जुलै २०२१ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे.
तौसिम इब्राहिम मणियार (वय ३३, रा. बारामती, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी करण अनिल तनपुरे (वय २३, रा. शिरसटवाडी) या युवकाने वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मणियार याने फिर्यादी तनपुरे यांना आरोग्य सेवक, तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली. मणियार याने तनपुरे याला बनावट नियुक्तिपत्र देऊन मुंबई कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले होते.
मात्र, तनपुरे याने चौकशी केली असता, नियुक्तिपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. तसेच, मणियार याने अक्षय बाळासाहेब कदम यालाही पोलिस शिपाईपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.