यवतमाळ : घराजवळील पुलावर बसून असलेल्या एका तरुणाशी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तिघांनी विनाकारण वाद घातला, तसेच त्याच्यावर स्टीलच्या कड्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ७ डिसेंबरला सकाळी ९ वाजेच्या सुमारास येथील लोहारा परिसरातील शिवम कॉलनीत घडली. क्षितीज सुदर्शन गायकवाड (२२, रा. शिवम कॉलनी लोहारा) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ७ डिसेंबरला सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराजवळील पुलावर बसून होता. यावेळी आरोपी गौरव उर्फ बंटी जीवन कांबळे (२८, रा. राधाकृष्णनगरी), केतन उर्फ छोट्या मधुकर पिल्लारे (रा. सिद्धेश्वरनगर) आणि त्यांचा अन्य एक साथीदार, असे तिघे जण तेथे आले. यावेळी कुठलेही कारण नसताना त्यांनी क्षितीजशी वाद घातला.
त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शिवाय स्टीलच्या कड्याने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याच्या नाकाला, जबड्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. तसेच तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तेथे धाव घेऊन क्षितीजची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. तसेच त्याला तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे अतिदक्षतागृहात त्याच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर त्याचे वडील सुदर्शन मधुकर गायकवाड (४७, रा. शिवम कॉलनी, लोहारा) यांनी याप्रकरणी लोहारा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून तीन आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. ११८(१), ३५२, ३५१ (३), ३(५) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.