बीड: चारित्र्यावर संशय घेऊन बॅट व दगडाने पत्नीसह लहान मुलाचा तर दुसऱ्या मुलाचा पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून खून करणाऱ्या संतोष जयदत्त कोकणे (रा.तकवा कॉलनी, शुक्रवार पेठ, बीड) या आरोपी पतीला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. गुरुवारी न्यायालयाने हा निकाल दिला.
संतोष जयदत्त कोकणे, असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणारी ही घटना २४ मे २०२० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास बीड शहरातील शुक्रवार पेठेतील तकवा कॉलनीत घडली होती. संतोष कोकणे याचा कुरकुरे विक्रीचा व्यवसाय होता. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने पत्नी, संगीता संतोष कोकणे (३५) व मुलगा सिद्धेश संतोष कोकणे (१०) या दोघांच्या डोक्यात लाकडी बॅट व दगडाने गंभीर दुखापत करून खून केला होता, तर दुसरा मुलगा कल्पेश (८) याच्या डोक्यात बॅट मारून त्यास बेशुद्ध करून नंतर पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून ठार केले होते.
या प्रकरणी आरोपी संतोष कोकणे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पेठ बीड ठाण्यातील तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र झाले होते. हे प्रकरण सुनावणीसाठी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग झाले. आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. भागवत एस. राख यांनी काम पाहिले, त्यांना जिल्हा शासकीय अभियोक्ता व इतर सर्व अति. सहा. सरकारी वकील यांनी मार्गदर्शन केले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार माधव नागमवाड, उपनिरीक्षक बी. बी. जायभाय यांनी सहकार्य केले.
१५ साक्षीदार तपासले
या प्रकरणाचा साक्षी पुरावा व सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्यासमोर झाली. आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच फिर्यादीसह इतर साक्षीदारांचे जबाब व इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन करून व सहा. सरकारी वकिल अॅड. भागवत एस. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.