मुंबई : मुंबईच्या भेंडी बाजार येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील निशानपाडा मार्गावर मध्यरात्री एक चार मजली इमारत अचानक कोसळली. ही इमारत खूप जुनी आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीत कुणी राहायला नव्हते. रात्री इमारत कोसळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे नागरिक तातडीने घराबाहेर पडले. या घटनेची माहिती त्यांनी अग्निशामक दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक बचाव कार्य राबवण्यासाठी तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, परिसरातील रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शोध आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.