पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चहा स्टॉलवालवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पोलीस निलेश सुभाष दरेकर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील शिवाजी नगर परिसरात ही घटना घडली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. येथील गॅस शेगडीवर ठेवलेला लायटर गरम होऊन त्याचा स्फोट झाला. येथील वडापावच्या गाडीवर दुपारी कर्मचारी जेवायला आले असता ही घटना घडली. त्यावेळी, झालेल्या आगीच्या भडक्यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, औंधच्या जिल्हा रुग्णालयात जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.