दिल्ली : क्रीडा जगतातून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवला आहे. डी गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. डी गुकेश यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली आहे. डी गुकेशने 14 डावांनंतर साडे सात आणि साडे सहा अशा फरकाने पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. डी गुकेशचं या ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावरुन सर्व क्षेत्रातून अभिनंदन केलं जात आहे.
सर्वात युवा बुद्धीबळपटू..
डी गुकेश याने या विजयासह अनेक विक्रम देखील रचले आहेत. गुकेश वर्ल्ड चॅम्पियन होणारा सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. तसेच 12 वर्षांनंतर भारताला नवा विजेता मिळाला आहे. डी गुकेश याच्याआधी 2012 साली विश्वनाथन आनंद चेस मास्टर ठरले होते.
डी गुकेशचा प्रवास..
वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. डी गुकेशचे आई आणि वडील दोघेही उच्चशिक्षित असून डी गुकेशची आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तर वडील डॉक्टर आहेत. मात्र गुकेशला आई-वडीलांपेक्षा वेगळी आवड होती ती म्हणजे चेसची. डी गुकेशने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून चेस खेळायची सुरुवात केली. गुकेशने त्यानंतर आता अवघ्या 11 वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आणि भारताचं नावं उंचावलं आहे. डी गुकेशने या दरम्यान अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
डी गुकेश याने विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीतून चेजची बाराखडी गिरवली असून आनंद यांनी गुकेशला चेजचे बारकावे शिकवले. गुकेशने वर्ल्ड चॅम्पियन होण्याआधी अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुकेशने सरावानंतरच्या 5 व्या वर्षी म्हणजेच 12 व्या वर्षी धमाका केला. गुकेश भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकवला. इतकंच नाही, तर गुकेशने 2023 मध्ये वर्ल्ड रँकिंगमधील पहिलं स्थान पटकावत एक नंबर कामगिरी केली. तसेच त्याने अवघ्या काही महिन्यांपूर्वी मार्चमध्ये गुकेशने वर्ल्ड चेस कॅण्डीडेट स्पर्धेत बाजी मारली. गुकेश याने या विजयासह वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलसाठी क्वालिफाय केलं. त्यानंतर आता गुडाकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.