पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरातील १० सार्वजनिक जलतरण तलाव ठेकेदारांना चालविण्यास देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुढील तीन वर्षे हे तलाव संबंधित ठेकेदार तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरण आदी सर्व कामकाज पाहणार आहेत. या निर्णयामुळे खर्चात बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून ‘केला जात आहे.
महापालिकेने शहरातील दहा जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी दोन ते तीन वेळा निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, अटी व शर्तीमुळे त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे निविदा रद्द करण्याची वेळ क्रीडा विभागावर आली होती. अखेर, अटी व शर्तीत बदलू करून नव्याने निविदा १३ ऑगस्ट २०१४ ला प्रसिद्ध केली होती. त्याला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यातील अधिक उत्पन्न देणाऱ्या ठेकेदारांना तलाव चालविण्यासाठी देण्यास स्थायी समितीची मान्यता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.१२) दिली आहे.
यामुळे महापालिकेचा जलतरण तलावावर होणारा कोट्यवधींच्या खर्चात बचत होणार आहे. पाणी शुद्धीकरण, सुरक्षारक्षक, जीवरक्षक, कर्मचारी, क्रीडा पर्यवेक्षक तसेच, दुरूस्ती काम, सुशोभिकरण, वीज बिल, पाणीपट्टी व इतर खर्च वाचणार आहे. ठेकेदारांकडून महापालिकेस एका तलावासाठी तीन वर्षाकरीता एकूण २८ लाख ६५ हजार ६०० रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. थेरगाव तलावासाठी १८ लाख ७२ हजार आणि नेहरूगर तलावासाठी २७ लाख रूपये महापालिका तिजोरीत जमा होणार आहेत.
दरम्यान, कसबा पेठ येथील एचओ टेक्रो या ठेकेदाराला संभाजीनगर, वडमुखवाडी, यमुनानगर आणि पिंपळे गुरव हे चार तलाव देण्यात आले आहेत. तर, कसबा पेठेतील अवधूत फडतरे या ठेकेदाराला भोसरी, पिंपरी गाव, सांगवी आणि कासारवाडी हे चार तलाव चालविण्यास मान्यता दिली आहे. शुक्रवार पेठेतील एचओ अॅक्क फन अनलिमिटेड पुल्सला नेहरूनगरचा आणि खडकवासला येथील हर्षवर्धन डेव्हलपर्सला थेरगाव येथील जलतरण तलाव देण्यात आला आहे.