बारामती : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १४) रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणकडून बारामती मंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदारांची ६७३५ तर वीजचोरीची १९३ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत.
शनिवारी (दि.१४) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार व वीजचोरीच्या प्रकरणातील वीजग्राहकांनी सहभाग नोंदवावा. वीजबिलांची थकबाकी असलेल्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन मालक किंवा ताबेदार यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केल्याने थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेली जागा थकबाकीमुक्त करण्यासाठी लाभ घ्यावा. तसेच वीजचोरी प्रकरणात तडजोड करून फौजदारी प्रकरणे निकाली काढण्याची या लोकअदालतीद्वारे संधी घ्यावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे व अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांनी केले आहे.