पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची सोमवारी (दि. 09) अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीनेच त्यांच्या खूनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपीनेच पूर्व वैमनस्यातून सतीश वाघ यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली असून, अन्य एकजण फरार असल्याची माहिती आहे. आरोपींनी सतीश वाघ यांचे कारमधून अपहरण करून चालत्या कारमध्ये धारदार चाकूने गळ्यावर एकदा नाही तर तब्बल 72 वेळा वार करून त्यांचा खून केला. सकाळी ते व्यायामासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळताच वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांच्याकडे अक्षय जावळकर नावाचा भाडेकरू राहायला होता. तोच खूनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. अक्षय जावळकर याच्यासह पवन श्यामकुमार वर्मा (वय-30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय-32 रा. वाघोली), विकास शिंदे (रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) या चौघांना पोलीसांनी अटक केली आहे.
सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास केला.
या घटनेनंतर पोलिसांची अनेक पथके तयार करून पुढील तपास करण्यात आला. या मार्गावर असलेल्या 600 ते 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसली. त्यानुसार त्यांनी वाघोली परिसरातून पवन शर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गुरसाळे आणि शिंदे या दोघांची नावे समोर आली. त्यांनी जावळकर याने आपल्याला वाघ यांची पाच लाख रुपयांना सुपारी दिल्याची माहिती चौकशीवेळी दिली.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा करण्यापूर्वी आरोपींनी कट रचल्याने भारतीय न्याय संहितेचे कलम 61 नुसार (भादंवि 120ब) वाढ करण्यात आली आहे. तर, या प्रकरणाचा तपास देखील गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.