इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झालीय आहे. या पुलामुळे दापूर-करमाळा तालुक्यांतील ऋणानुबंध ५० वर्षांनंतर पुन्हा प्रस्थापित होणार आहेत. उजनी जलाशयामुळे दोन्ही तालुक्यांतील दळणवळण जिकिरीचे झाले होते. दीर्घ काळापासून असलेल्या जोडपुलाच्या मागणीला निवडणुकीपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. आता या कमला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
भीमा नदीकाठच्या पाणवठ्यावर भेटणाऱ्या दोन जिल्ह्यांतील लोकांमध्ये ५० वर्षांपूर्वी ऋणानुबंध जुळले होते. मात्र, उजनी धरणाच्या पाण्यामुळे त्यात काहीसे अंतर निर्माण झाले होते. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर इंदापूर तालुक्यातील गावांना करमाळा तालुक्यातील हाकेच्या अंतरावरील गावात जाण्यासाठी रस्ते मार्गाने ८० ते ९० किलोमीटरचा वळसा घालून किंवा जलमार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.
जलवाहतुकीत ५० हून अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे उजनी जलाशय जोडपुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी या मागणीने तोंड वर काढले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूल उभारणीची घोषणा तातडीने केली आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर या कामाला आता प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. त्याबाबत दोन्ही काठच्या नागरिकांकडून समाधानाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.