बारामती: विधानसभा निवडणूक निकालानंतर युगेंद्र पवार यांचा आभार दौरा सुरू असून, ते मतदारसंघातील गावांना भेटी देत स्थानिकांशी संवाद साधून आभार व्यक्त करत आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढवणार व जिंकणारही, असा विश्वास या वेळी पवार यांनी व्यक्त केला.
विधानसभेत शाश्वत विकासाचा अजेंडा घेऊन आपण लढलो. ही लढाई सोपी नव्हती. तरीही आपण निर्धाराने लढलो, याचे समाधान आहे. पुढील काळातही आपली साथ व सोबत कायम ठेवा. खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी यापुढेही कायम कार्यरत असणार असुन, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सतत उपलब्ध असेन. आता आपल्याला संघटना मजबूत करून आगामी काळात सर्व निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.
पुढील काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण लढणार असून त्या जिंकूनही दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीने खूप काही शिकवले आहे, यामध्ये आलेल्या अनुभवांचा फायदा आगामी निवडणुकीत नक्की होईल. यापुढे तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.