पुणे : गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अल्वयीन मुलाने शाळकरी मुलीला आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. त्यातूनच ही शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वय 12 वर्ष चार महिने असून आरोपी अल्पवयीन मुलाचे वय 17 वर्ष आहे. अल्पवयीन मुलाने त्या पीडित मुलीला आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित मुलीने हा घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. हा प्रकार मागील ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत घडला आहे. त्यानंतर घडलेला प्रकार ऐकून आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने 10 डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुलाविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.