नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यापीठाने पोलिसांत धाव घेतली असून विद्यापीठाचे लिपिक किशोर जोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय वर्षाची लेखी परीक्षा ९ डिसेंबरला दुपारच्या सत्रामध्ये पार पडली. द्वितीय वर्ष एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या पॅथॉलॉजी १ या विषयाच्या विभाग २ ची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या सुमारे एक तास अगोदर फुटल्याचा मेल विद्यापीठास प्राप्त झाला होता. या घटनेची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली.
सर्वस्तरावरील चौकशांबरोबरच परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. संबंधित विषयाची फेरपरीक्षा १९ डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत विद्यापीठ स्तरावर चौकशी समिती नेमण्यात येणार आहे.