वाई: महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी (ता. वाई) येथील श्री काळूबाई देवीची यात्रा १२ जानेवारीला भरणार असून, यात्रा उत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. यात्रेचा मुख्य दिवस १३ जानेवारी असून, यात्रा उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे, अशी माहिती मांढरदेव देवस्थान विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.
राज्यभरातील भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री काळुबाई देवीची यात्रा दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. यावर्षी १२ जानेवारीला देवीचा जागर चालू होऊन मुख्य दिवस १३ जानेवारी असणार आहे. देवीच्या यात्रेसाठी कापूरहोळ- भोर आंबाडे मार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंबाडखिंड घाटमार्गे भाविकांची गर्दी होत असते. मात्र, यंदा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला मागील वर्षाच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी होण्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने मांढरदेवी यात्रा काळासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून दिले तरच भाविक भक्तांना आंबाडखिंड घाटमार्गे काळूबाई देवीला जाणे सोयस्कर ठरणार आहे. अन्यथा भाविकांना शेकडो किलोमीटर लांब पल्यावरून वाईमार्गे देवीच्या यात्रेला आर्थिक नुकसान सहन करून जावे लागणार आहे.