पुणे: पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मोहजालात फसवून सायबर भामट्यांनी ७२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यासंदर्भात मंगळवारी (दि. १०) एका महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार नागरिक कर्वेनगर परिसरात वास्तव्याला आहे. त्यांनी दिलेल्या फियार्दीनुसार मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार नागरिक घटस्फोटित आहेत.
ते पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. भामट्यानी त्यांना सोशल मीडियावरून एक फॉर्म पाठविला. फॉर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. शर्माने समाज माध्यमात अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच हा प्रकार टाळण्यासाठी तिने बँक खात्यात तातडीने पैसे भरण्यास सांगितले.
त्यानंतर, आरोपी शर्माचा साथीदार विक्रम राठोडने दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याची बतावणी करून त्यांना धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. त्याचा साथीदार राहुल शर्मा याने त्यांच्याशी संपर्क साधला व सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना बँक खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे, घाबरलेल्या ज्येष्ठाने त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. भामट्यानी अधिक त्रास देण्यास सुरुवात केल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.