छत्रपती संभाजीनगर: लग्नाच्या सोळा वर्षांनंतर एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला. मात्र, कमी वजनाच्या कारणाने त्या तिन्ही नवजात शिशुंना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नवजात शिशू विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. महिनाभराच्या उपचारानंतर तब्येत सुधारल्याने बुधवारी (दि.११) त्या तिन्ही बाळांना एकाच वेळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंतची ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बुलढाणा जिल्हयातील मानसी (नाव बदलले आहे) या महिलेने घाटी रुग्णालयात १३ नोव्हेंबर रोजी एक-दोन नव्हे तर चक्क तिळ्यांना जन्म दिला. दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्य जन्मली. या महिलेची प्रसूती सिझरने करण्यात आली. लग्नाच्या तब्बल १६ वर्षानंतर आई बनल्याचा आणि त्यातही तिळी अपत्य प्राप्तीचा आनंद गगणात मावत नव्हता. मात्र, तिघे शिशु कमी वजनाचे होते. त्यामुळे प्रसूतीनंतर लगेच तिघांना नवजात शिशू विभागात हलवण्यात आले.
विभागप्रमुख डॉ. एल.एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे यांच्यासह तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक यांनी उपचारासोबतच काळजी घेत होते. मुख्य म्हणजे या बाळांच्या आईला त्यांना जवळ घेण्यास पूर्ण मुभा होती. त्यामुळे रुग्णालयातही उपचार सुरु असतानाही या तिळ्या भावंडांना त्यांच्या आईकडून मायेची उब मिळत होती. याचा सकारात्मक परिणाम होऊन हळूहळू या बालकांचे वजन वाढले. त्यामुळे २८ दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी (दि. ११) दुपारी या तिन्ही शिशुंना एकाच वेळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यावेळी डॉ. जॉन बिस्वास, डॉ. शेख मुन्कीम, डॉ. सोनाली आवळे, डॉ हेमंत पाटील, डॉ. सुमीत जिना, निलिका कासार, उषा जयवाल, आम्रपाली निकाळजे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.