पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र, यातील 30-35 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहेत. माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. अशातच ज्या महिला खोटी माहिती देऊन लाभ घेणा-या आहेत. त्या महिलांविरुद्घ एआयआर दाखल करण्यात येणार असल्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
लाडक्या बहीण योजनेतंर्गत सर्वसमावेशक पडताळण मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी करतील. तसेच लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे पण खोटी माहिती देऊन लाभ घेत असेल तर अशा लाभार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्याचा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाने दिला आहे. ही पडताळणी मोहित महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येईल. जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल, असे विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबरमधील रकमेचे वितरण होईल. महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे. या सूचनानंतर जीआर जारी केला जाईल. वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून वितरीत केला जाईल की नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रीमंडळात घेतला जाणार आहे. त्यानंतर एक जीआर जारी केला जाणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करण्यात येणार आहे.
विभागाला फसव्या लाभार्थीबाबत 200 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. राज्यात मंजूर झालेल्या 2.5 कोटी अर्जापैंकी 1 टक्के 2.5 लाख अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यापक पडताळणीसाठी दोन ते तीन महिने लागतील असे सांगितले जात आहे. या पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हे आहे. एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करायची याची कल्पना येईल असे सांगण्यात आले.
कशी होणार पडताळणी…?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट होती. वार्षिक 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या उत्पन्नाचा पुरावा खरा आहे की खोटा याची तपासणी केली जाणार आहे. या सोबतच लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी त्यांच्या आयकर पात्रांची देखील व अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची देखील पडताळणी केली जाणार आहे. पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.