पुणे : ‘लाडकी बहीण’ योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी पुन्हा सुरू करण्यात आली असून, त्यात सुरुवातीपासून आतापर्यंत तब्बल १० हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. एकूण अर्जदारांपैकी ६९ हजार १७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.
गिरासे म्हणाले की, महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला. अल्प कालावधीत या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. आचारसंहिता जाहीर झाल्याने अर्जाची छाननी बाकी होती. ती संपताच प्रशासनाने प्रलंबित अर्जाची छाननी सुरू केली आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत. शिवाय ५ हजार ७२४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी आढळल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. या अर्जदारांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आली आहे. एकूण प्रलंबित बारा हजार अर्जाची छाननी अद्याप बाकी आहे. म्हणजेच आतापर्यंत सुमारे ९९.४३ टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी झालेल्या एकूण अजर्जापैकी ६९ हजार १७५ अर्जाचे बँकेच्या खात्याशी आधार सीडिंग करणे राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांकडून रिल्स, व्हिडीओवर वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला, तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून, याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने कळवण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये, तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून कळवण्यात येईल. लाडकी बहीण योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, याकरिता अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी, अशा सूचना जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितले
लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यातील शिल्लक अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १२ हजार अर्जाची छाननी होणे अद्याप बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत सुमारे दहा हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार हे सरकारकडून लवकरच जाहीर होईल.
– जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग