लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमधून देशी विदेशी दारूचा साठा करून अवैध विक्रीचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून मंगळवारी (ता. 10) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. या छाप्यात तब्बल 28 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिक्षीत दिवाकर शेट्टी (वय-29, रा. संभाजीनगर कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अतुल अमृत रायबोले वय (वय-34) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल रायबोले हे पोलीस अंमलदार असून ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रायबोले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्त्यव्य बजावीत असताना, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अमित बिर्याणीच्या शेजारील बोळीत अवैध दारू विक्री केली जात आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी दिक्षीत शेट्टी हा त्याच्या ओळखीच्या लोकांना अमीत बिर्याणी हॉटेलच्या बोळात अनधिकृतपणे दारू विकताना आढळून आला. पोलिसांनी या छाप्यात वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशीच्या सुमारे 28 हजार 235 रुपये किंमतीच्या 196 बाटल्या जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक दिक्षीत शेट्टी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस जगदाळे करीत आहेत.