-बापू मुळीक
सासवड : श्री शेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील श्री दत्त जयंती सोहळ्याला शुक्रवार (दि. 13) पासून प्रारंभ होत आहे. या निमित्त नारायणपूर येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सासवड पोलीस प्रशासनांनी दरवर्षीप्रमाणे यात्रा काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येते. तसेच वाहन चालक आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी केले आहे. शुक्रवारी (दि. 13) रात्री 11 ते रविवारी (दि. 15) दुपारी चार वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे.
या सोहळ्यास देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. याकरिता वाहतुकीचे नियमन व्यवस्थित व्हावेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता सासवड ते कापुरहोळ मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून सासवड ते कापूरहोळ, बेंगलुरु महामार्गाकडे जाणारी जड -अवजड वाहने, सासवड- परिंचे गाव वीर मार्गे -सारोळा तसेच सासवड -दिवे मार्गे कात्रज चौक, अशी जातील. तसेच कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील जड अवजड वाहने कापूरहोळ -शिंदेवाडी कात्रज चौक मार्गे सासवड अशी जातील. या मार्गांचा वाहन चालकांनी अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोहळ्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, सासवड- भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, सासवड पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 70 पोलीस कर्मचारी, 20 होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे.
श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज आहे. सोहळ्यासाठी प्रत्येक मुख्य चौकात दक्षता कक्ष उभारला आहे. यात्रा काळात बाहेरून येणाऱ्या जड वाहन चालकांनी नारायणपूरला न येता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
-ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक- सासवड पोलीस ठाणे