पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावं लागू शकतं, अशी चर्चा समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार, योजनेचे निकष बदलणार? असे अनेक प्रश्न लाडक्या बहीणींच्या मनात निर्माण झाले आहे. याबाबात आता स्वत: माजी मंत्री व विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे…
आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या पत्रकात काय म्हटलंय?
महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकात म्हटलं आहे की “सर्वांना कळविण्यात येते की राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निर्दशनास आलेले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रील्स व व्हिडीओंद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलं आहे की त्यांनी लोकांधील संभ्रम दूर करावा. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी”.
दरम्यान, माजी मंत्री व विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन राज्यातील लाडक्या बहिणींना केलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास… pic.twitter.com/mtOnnIAWNo
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 11, 2024