-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्ती येथून एका चौदा वर्षीय अल्पवयीन युवतीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करणा-या आरोपीला पोलिसांनी परभणी मधून ताब्यात घेत अटक केली आहे.
दुर्गादास रेशीम मकर (रा. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथून 20 जुलै रोजी एका चौदा वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेली युवती परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळली. पोलिसांनी परभणी येथे जात युवतीसह त्याच्या सोबत असलेल्या दुर्गादास मकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर युवतीकडे चौकशी केली असता दुर्गादास याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिला परभणी येथे घेऊन जात मंदिरामध्ये तिच्या गळ्यात हार घातले. त्यानंतर एका खोलीमध्ये ठेवून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला असल्याचे युवतींनी पोलिस चौकशीत सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी सदर अपहरणाबाबतच्या गुन्ह्यामध्ये आरोपीविरुद्घ बाललैंगिक अत्याचार सह अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. दुर्गादास मकर याला ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे करत आहे.