पुणे : पुण्यात अजूनही अपघातांचे सत्र सुरु आहे. अशातच आता भरधाव कारच्या धडकेने एका पादचा-याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघोली परिसरात घडली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाविरूध्द लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विष्णू हरी भटोराय (वय 47, सध्या रा. वाडे गाव, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत लोकबहाद्दुर नरबिक (वय 37) यांनी लोणीकंद (वाघोली) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू भटोराय आणि नरबिक हे दोघेजण मित्र आहेत. दोघे जण मजुरी करतात. रविवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी भटोराय आणि नरबिक हे दोघे नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून रात्री आठच्या सुमारास निघाले होते. त्यादरम्यान, कटकेवाडी परिसरातील एका हॅाटेलसमोर भरधाव कारने भटोराय यांना धडक दिली. यावेळी या अपघातात भटोराय हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.