योगेश मारणे
शिरूर : न्हावरे-तळेगाव ढमढेरे महामार्गावर उरळगाव (ता.शिरूर) येथील जिओ पेट्रोल पंपा समोर भरधाव वेगात फोर व्हीलर महेंद्रा जीपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.११) सकाळी घडली आहे. विशाल बाळासाहेब राजगुरव(वय – ३२,रा.निर्वी ता.शिरूर,जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राजगुरव हे आपल्या दुचाकीवरून न्हावरे मार्गाने सणसवाडीकडे कामानिमित्त चालले होते. दरम्यान उरळगाव हद्दीत जियो पेट्रोल पंपासमोर तळेगाव ढमढेरे बाजूने आलेल्या फोर व्हीलर जीपने राजगुरव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये राजगुरव हे गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रमोद राजगुरव यांनी या घटनेची फिर्याद दिली. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.