नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव तालुक्यातील ८४ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर संबंधित विविध कार्यकारी सोसायटीचे नाव लावून या थकबाकीदार शेतकऱ्यांची मालमत्ता जप्त करणार आहे. याबाबत संबधित शेतकऱ्यांना बँकेने नोटीस काढली असून, या शेतकऱ्यांकडून कर्जापोटी वितरित केलेले तीन कोटी ४६ लाख व त्यावरील व्याज बँकेकडून वसूल करण्यात येणार आहे.
याबाबतची नोटीस नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये ही नोटीस काढण्यात आली आहे. संबंधित ८४ शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून कर्जापोटी घेतलेली रक्कम भरण्यास कसूर केली आहे. त्यामुळे बँकेचे निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी यांनी या शेतकऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्यात आला आहे. कर्जदार शेतकऱ्यांकडून नागरिकांनी मालमत्तेसंबंधित कोणताही व्यवहार करू नयेत आणि व्यवहार केल्यास त्यास संबंधित कर्जदाराच्या बोजाची रक्कम आणि त्यावरील व्याज यास अधीन राहावे लागेल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.